टीम लोकमन मंगळवेढा |
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावच्या हेंबाडे वस्ती येथील मराठा बांधवांच्या वतीने मदत पाठविण्यात आली असल्याची माहिती डोंगरगाव येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सोमनाथ इंगळे यांनी दिली.
आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सकल मराठा समाजाचे मोठे आंदोलन सुरू आहे. एकीकडे पावसाच्या सरी कोसळत असताना राज्याच्या राजधानीत मराठा आरक्षणाच्या लढ्याचा वनवा पेटल्याचे दिसत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याचे दिसत असून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा समाज बांधवांचा महासागर मुंबईमध्ये धडकल्याने राजधानीचा श्वास घुटमळला होता. मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य सरकारनेही या आंदोलनाची गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मराठा समाजाविषयी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही शक्य आहे ते नियमाच्या चौकटीत बसून देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले आहे.
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी राज्य सरकारने मान्य करून मने जिंकावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही चांगली संधी चालून आलेली आहे. त्यांनी मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नये. आता मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. राज्य सरकार हे आमच्याशी आडमुठेपणाने वागल्यास आम्हीही तसेच वागू. आरक्षण द्यायला जेवढा विलंब होईल तेवढे मराठे मोठ्या संख्येने मुंबईत येतील. असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान राज्य सरकारने मुंबईतील हॉटेल्स, चहा, नाश्ता व वडापावच्या गाड्या बंद करून आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छतागृहांची आणि पार्किंगचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नाही. हे सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट वागत आहे. सरकारने आडमुठेपणाची घेतलेली भूमिका सोडून द्यावी. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशाराही मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे. आंदोलकांना चहा, पाणीही मिळालेले नाही. ते दिवसभर पावसात भिजत आहेत. तरीही सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत आहे. त्यामुळेच मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या चौकात घुसल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही जर सहकार्य करणार नसाल तर तुम्ही जिल्ह्यात आल्यावर तुमच्याशी देखील असाच व्यवहार केला जाईल. असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या अन्न व पाण्याची मोठी गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन डोंगरगाव येथील मराठा समाजाच्या युवकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून अन्नधान्याची पाकिटे, धान्याच्या पिशव्या व पाण्याच्या बॉटल्स मुंबई येथील आंदोलन स्थळी पाठविल्या आहेत.
या मदत कार्यात मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावच्या हेंबाडे वस्ती येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सोमनाथ सिताराम इंगळे, समाधान सिताराम इंगळे, बापू सोपान हेंबाडे, मोहन जामुवंत हेंबाडे, योगेश अर्जुन मोरे, दत्तात्रय ज्ञानू हेंबाडे, बंडू उत्तम हेंबाडे, दत्तात्रय महादेव हेंबाडे, अण्णासाहेब रामचंद्र हेंबाडे, गणेश तानाजी हेंबाडे, संजय मधुकर डोंगरे, पांडुरंग प्रभू हेंबाडे, अण्णासाहेब भोजलिंग हेंबाडे, नामदेव शिवाजी हेंबाडे, बजरंग उत्तम हेंबाडे, योगेश प्रभाकर हेंबाडे, युवराज मस्कु बुरुंगले सहभागी झाले होते.