टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यादेखील उपस्थित होत्या.
ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे आणि शहा यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. नाथाभाऊंच्या सुनबाईला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.
एकनाथ खडसेंना भाजपमध्ये मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चाही सुरु आहे. दरम्यान नाथाभाऊ मोठे नेते आहेत त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश होईलच असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.
भारतीय जनता पार्टी हे माझे घर आहे. भाजपच्या पायाभरणीपासून घर होईपर्यंत मी काही ना काही योगदान दिलेले आहे. काही नाराजीमुळे पक्षातून बाहेर पडलो होतो. आता ती नाराजी दूर झालेली आहे, असा खुलासाही एकनाथ खडसे यांनी यापूर्वी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मला संकट काळात मोठा आधार दिला. त्याबद्दल त्यांचा मी ऋणी असल्याची भावनाही खडसेंनी व्यक्त केली होती. आता खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या झालेल्या दारून पराभवामुळे राज्यातील भाजप नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. या चर्चा सुरू असतानाच नाथाभाऊंचा भाजप प्रवेश लवकरच होणार असून त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चाही जोर धरत आहे. नाथाभाऊंना कोणती मोठी जबाबदारी भाजप देणार याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकारांचेही लक्ष आहे.












