न्यूज लोकमन सांगोला |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण व कृषिमंत्री तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी सांगोला दौऱ्यावर येत असून त्यांची सांगोला येथे जाहीर सभा होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रचारसभेचे शुक्रवारी २६ एप्रिलला दुपारी २ वाजता आयोजन करण्यात आले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर मोहिते पाटलांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही निवडणूक मोहिते पाटलांच्या राजकीय अस्तित्वाची असल्याने मोहिते पाटील परिवार या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरला आहे.
या मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे. या मतदारसंघातील समाजामध्ये वलय असणारे समाजाचे मोठे नेते सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि गेल्या ४० वर्षापासून मोहिते पाटलांचे राजकीय विरोधक असणारे माळशिरस तालुक्यातील वजनदार नेते उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ दिली आहे. त्यामुळे सध्या तरी धैर्यशील मोहिते पाटलांचे पारडे जड वाटत आहे. ही निवडणूक जिंकून कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठायचीच या इराद्याने धैर्यशील मोहिते पाटील या निवडणुकीत उतरले आहेत. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून २०१९ चा अपवाद वगळता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. २०१९ मध्ये भाजपकडे गेलेला मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी शरद पवारांनी ही मोठी ताकद या मतदारसंघात लावली आहे. मोहिते पाटलांसोबतच शरद पवारांच्याही प्रतिष्ठेची ही निवडणूक म्हणावी लागेल.
या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्यावेळी मोहिते पाटलांमुळे ही निवडणूक रणजीतसिंह यांना सोपी झाली होती. परंतु मोहिते पाटील विरोधात असल्याने रणजीतसिंहांना निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अर्थातच फडणवीसांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित व प्राबल्य असणाऱ्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मोठी चढाओढ दिसत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमी वरती शरद पवारांचा सांगोला दौऱ्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पवारांच्या सांगोला दौऱ्यात कोण नवीन नेता पवारांच्या व्यासपीठावर येणार आणि पवार सांगोल्यात येऊन काय राजकीय खेळी करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याची नजर आहे.










