नांदेड : उज्वला गुरसुडकर
निवडणूक संपली आतातरी लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला या बाधित शेतकऱ्यांची आठवण होईल का..? आणि अनुदान व पीकविमा मिळेल का..? असा सवाल शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे.
कंधार तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन चे अतोनात नुकसान झाले , उत्पन्नात ही मोठ्या प्रमाणावर घट झाली. याबाबत नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश तत्कालीन तहसीलदार यांनी दिले. त्यानंतर महसूल, पंचायत व कृषी विभागाने संयुक्त पंचनामेही केले. त्यानुसार तालुक्यातील १२३ गावांतील २३ हजार ४०० हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकांचे नुकसान होऊन ३७ हजार ६०० शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे , असाअहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. पंचनामे होऊन सात महिने झाले तरीही अनुदान काही मिळेना तेंव्हा निवडणूक संपल्यावर तर प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना या बाधित शेतकऱ्यांची आठवण होईल का..? आणि अनुदान व पीकविमा मिळेल का..? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. गेले वर्षी खरीप हंगामात २४ हजार ६५८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. परंतु खरीप हंगामामध्ये पडलेला पावसाचा खंड, सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस, तापमानात झालेला बदल, तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. याबाबत नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या. त्यांनतर महसूल, पंचायत व कृषी विभागाने कंधार, कुरूळा, फुलवळ, पेठवडज, बारूळ, दिग्रस (बु), उस्माननगर आदी महसूल मंडळांमध्ये संयुक्त पंचनामे केले.
या झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल गुरुवारी ता. ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानुसार तालुक्यात १२३ गावांतील २३ हजार ४०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३७ हजार ६०० शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
बाधितांना मदतीची प्रतीक्षा…
सोयाबीनच्या पिकांचे नुकसान बघून शेतकरी खचला आहे. हवालदिल झाला आहे. घेतलेले कर्ज फेडण्यासोबत, पुढील दिवसांमध्ये कुटुंबाचे पालन पोषण, मुलांचे शिक्षण कसे करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच यंदाची खरिपाची पेरणी कशी करावी या चिंतेत असलेल्यांना नुकसान भरपाई व गेलेवर्षीचा पीकविमा कधी मिळणार याची चिंता लागली असून यंदाच्या खरिपाची पेरणी तोंडावर आली असतांना तरी प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना या बाधित शेतकऱ्यांची आठवण होईल का..? असा सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.







