टीम लोकमन मंगळवेढा |
आज जागतिक महिला दिन! हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे.
आज आपण कल्पना चावला, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्वान महिलांना आदराने स्मरण करतो. त्यांनी आपल्या कार्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने उद्यसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘श्रीनीअंबा नृत्यालय’ सोलापूर येथील भरतनाट्यम विशारद श्रीनिवास काठवे व त्यांच्या पत्नी भरत नाट्यम विशारद सौ.अंबिका श्रीनिवास काठवे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी मंगळवेढ्यातील हिरकणी महिला पतसंस्थेच्या चेअरमन व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यादेखील आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित अतिथींचा डॉ. पुष्पांजली शिंदे व प्रशालेचे प्राचार्य श्री. सुधीर पवार यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व मावशी, अटेंडर यांचा सन्मान प्रशालेतील विद्यार्थिनींनी बनवलेल्या भेट कार्ड देऊन करण्यात आला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.
श्रीनिवास काठवे यांनी महिला दिनानिमित्त प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. भरत नाट्यम या नृत्य प्रकाराविषयी माहिती दिली. डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या महिलांसमोर असलेल्या समस्या अडचणी विशद केल्या. आधी स्वतःवर प्रेम करायला शिका हा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
प्राचार्य सुधीर पवार यांनी देखील महिला दिनानिमित्त प्रशालेतील सर्व महिला व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रीनिवास व अंबिका काटवे यांनी भरतनाट्यम नृत्य सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सुद्धा सहभाग घेतला. महिला दिनानिमित्त ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम अतिशय वेगळ्या स्वरूपाचा ठरला.
हा कार्यक्रम घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ज्याप्रमाणे विविध उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना भरतनाट्यम शिकता यावे यासाठी नृत्य वर्ग सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य यांनी दिली. हे ऐकून सर्व विद्यार्थिनींचा आनंद गगनात मावत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना एक आगळीवेगळी भेट मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. पुष्पांजली शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.