टीम लोकमन मंगळवेढा |
संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अनेक ठिकाणी याबाबत मोठ्या पैसाही लागल्या आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीचे नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
नाशिक येथील पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, महायुती व मित्र पक्षाकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप सुरु आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात निवडणुकीत २ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी खर्च करण्यात आले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांचाच विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्थर हे भाजपच्या मतदारांना आवडलेला नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला १३ ते १४ जागा, शिवसेना शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. एकूण महायुतीला १६ ते १८ जागा मिळतील असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. गावागावात पाकीट वाटले जात असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला. पैसे वाटपाच्या आरोपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.