टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा कशा आहेत याची पाहणी करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानक भेट दिली. आज भरलेल्या आठवडा बाजाराची पाहणी केल्यानंतर व्यापारी, शेतकरी व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्ष्यात आल्याने त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
व्यापारांसाठी व शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या बाजार कट्ट्यावर अनेकांनी खोकी टाकली आहेत. वाहने लावली आहेत यामुळे शेतकऱ्यांना खाली चिखलात बसावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेच्या प्रशासनास जाब विचारत तुमचे बाजारवर व कामावर लक्ष असते का? ग्रामीण भागातून बाजारसाठी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, अशा कडक शब्दात मंगळवेढा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
सध्या पाऊस सुरू असल्याने बाजार आवारामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पूर्ण बाजारामध्ये सिमेंट काँक्रीट केले असतानाही त्यावर नगरपालिकेने मुरूम टाकून अकलेचे तारेच तोडले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने भाजीपाला विक्रीसाठी बसण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बाजार कट्ट्यावर केलेले अतिक्रमण काढून बाजार व्यवस्थित शेडमध्ये भरवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या.
त्याचबरोबर व्यापारी महिला व बाजारला येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. त्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करा त्याचबरोबर आठवडा बाजार मध्ये अजून काही निधीची कमतरता आहे का? आठवडा बाजारमध्ये साठत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करा. ताबडतोब निधीच्या तरतूद करतो मात्र शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापिही सहन करणार नाही अशा शब्दात नगरपालिका प्रशासनास सुनावले.
बाजारला येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेकडून करण्यात आली नाही. ग्राहकांनी रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे याबाबत पोलीस प्रशासनास वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा सूचना दिल्या. आमदार समाधान आवताडे यांनी अचानक आठवला बाजार मध्ये जाऊन पाहणी करत व्यापारी ग्राहक यांचे विचारपूस केल्याने पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासमवेत मंगळवेढा नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी साळुंखे, चंद्रकांत पडवळे, शेतकरी संघटनेचे नेते युवराज घुले, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, महादेव जाधव, युवक नेते सचिन शिंदे उपस्थित होते.
….अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा
मंगळवेढा शहरासाठी कोट्यावधीचा निधी आणला असून टेंडर होऊन सुद्धा अद्यापही काही ठेकेदारांनी कामे सुरू केली नाहीत. ती कामे तात्काळ सुरू करावीत. जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा आणि तातडीने कामे सुरू करा असा सूचना आमदार आवताडे यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या.









