टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाले मात्र अद्यापही नवीन सरकार स्थापन झाले नाही. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ज्यामध्ये महायुतीला दणदणीत असे अनपेक्षित यश मिळाले. 288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या महायुतीला 225 जागा मिळाल्या. यात सर्वाधिक 132 जागा भाजपला मिळाल्या आहेत.
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळून देखील अद्यापही सरकार स्थापनेच्या हालचाली झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले होते. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून ते संपूर्ण 5 वर्षासाठी मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर येत आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याने आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कुठली जबाबदारी असणार आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. नव्या सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचेही समजते.