टीम लोकमन सोलापूर |
भारतातील लग्नसमारंभ म्हणजे लाखो-कोटींचा खर्च, झगमगाट आणि दिखाऊपणा..असंच काहीसं चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षातील राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या मुलांचे शाही विवाह सोहळे अवघ्या देशाने पाहिले आहेत. परंतु सोलापुर जिल्ह्यात नुकताच एक आदर्श विवाह पार पडला आहे.
अवघ्या 150 रुपयांत पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कन्येचा विवाह नोंदणीकृत पद्धतीने पार पडला आहे. दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा सावंत हिचा विवाह शुभम शिंदे या उच्चशिक्षित अधिकारी असलेल्या तरुणासोबत सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. या विवाहाला दोन्ही कुटुंबांतील काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
शुभम शिंदे हे शासनाच्या पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर सुषमा सावंत यांनी नुकतेच भारती विद्यापीठातून मानवी शरीररचना विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही नवविवाहित उच्चशिक्षित आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे शाही विवाहाचा खर्च टाळत सुमारे 25 ते 30 लाख रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय नवविवाहित दांपत्याने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. सावंत आणि शिंदे परिवाराने घेतलेला हा निर्णय समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
या विवाहासंदर्भात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले…
माझी कन्या सुषमा हिचा विवाह चिरंजीव शुभमसोबत होत आहे. हा थोडा वेगळा विचार आहे. आदर्श असाच विचार आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा राष्ट्रपुरूषांनी सुद्धा आपल्याला प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत फार व्यथा सहन करून आदर्श विचार आपल्या समोर ठेवले आहेत. पण ते आदर्श विचार अंमलात आणत असताना आज सुद्धा आपणाला अडचण येते. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा उत्सव मोठा असतो. प्रत्येक कुटुंब या विधीसाठी एक दोन महिने व्यवस्था करतो. आर्थिक असणारी सर्व पुंजी किंवा नसेल तर कर्ज काढून सुद्धा ती समाजासमोर मांडली जाते.
या विषयाला आणि विचारांना मी तोडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु माझ्या मुलाने ते करावं असं मला वाटणं अवघड होतं. कारण लादनं हा विषय मी माझ्या आयुष्यात कुणावर केला नाही. कितीही छोटं लग्न करायचं म्हटलं तर ते लाखातच जातं. माझ्या शिक्षक वर्गाचा विचार केला तर पंचवीस लाखाच्या घरात या लग्नाचा खर्च झाला असता. पण त्यापासून सुद्धा परावृत्त ठेवलंय. त्यांनी जो संकल्प केलाय तो विचारा माझ्या मनात आहे. भविष्यातही त्या संकल्पासाठी मी काम करणार आहे. अशी प्रतिक्रिया पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.








