टीम लोकमन मंगळवेढा |
जागतिक सायकल दिनानिमित्त मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला-मंगळवेढा या मार्गाने आयोजित केलेली सायकलवारी मंगळवेढ्यातील सायकलप्रेमी तरुण उद्योजकाच्या जीवावर बेतली असून आज पहाटे सांगोल्याजवळ झालेल्या अपघातात उद्योजक सुहास ताड यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेने संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून सुहास ताड या तरुण उद्योजकाच्या अपघाती मृत्यूने मंगळवेढा परिसरावर शोककळा पसरली आहे. सायकल चालवा आणि निरोगी रहा हा संदेश घेऊन सुहास ताड हे सायकलप्रेमी सायकलिंग करत होते. मंगळवेढ्यातील तरुणांनी आयोजित केलेल्या सायकलवारीतही त्यांचा नेहमी सहभाग असायचा. अनेक तरुणांना त्यांनी सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
जागतिक सायकल दिनाच्या पूर्वसंध्येला काल मंगळवेढा-सांगोला-पंढरपूर-मंगळवेढा असा सायकल प्रवास केल्यानंतर आज जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलवारी आयोजित करण्यासंदर्भात काल रात्री त्यांची इतर मित्रांसमवेत व्हाट्सअप चॅटिंगद्वारे चर्चा झाली होती. त्या चर्चेनुसार आज पहाटेच ते सर्वजण सायकलवारीला निघणार होते. परंतु त्यांचे इतर मित्र पहाटे लवकर न उठल्यामुळे ते एकटेच सायकल वारीसाठी गेले होते.
सायकलवरून प्रवास चालू असतानाच सांगोला येथे भरधाव वाहनाने सुहास ताड यांच्या सायकलला जोराची धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांना ताड यांच्या खिशात लायसन्स सापडले. त्यावरून त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. तरुण आणि उमद्या उद्योजकाच्या अकाली जाण्याने मंगळवेढ्यातील व्यापारी वर्गात शोककला पसरली आहे.
शांत, संयमी आणि मितभाषी स्वभाव असलेल्या सुहास ताड यांनी मंगळवेढ्यात उद्योगांचे जाळे उभारले होते. काही महिन्यांपूर्वी मंगळवेढा पंढरपूर रोडवरील खटावकर मॉल आगीत जळून खाक झाला होता त्या मॉलमध्ये सुहास ताड हे पार्टनर होते. ताड यांच्या मालकीचे शितल कलेक्शन हे कापड दुकान देखील मंगळवेढ्यातील नामांकित व्यवसाय आहे. मंगळवेढा मरवडे रोडवर भालेवाडी फाट्याजवळ ताड यांचा पेट्रोलपंप देखील आहे. सुहास ताड हे मंगळवेढ्यातील मोठे सायकलप्रेमी होते. त्यांनी यापूर्वी मंगळवेढा ते बानूरगड, मंगळवेढा ते रायगड, मंगळवेढा ते तुळजापूर अशी सायकलवारी केली आहे.
सुहास यांचा सामाजिक कार्यात देखील नेहमी सहभाग असायचा मंगळवेढ्यातील रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे ते सदस्य होते. सुहास ताड यांचा अपघाती मृत्यू होऊन अकाली जाण्याने मंगळवेढ्यातील उद्योग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. अशीच भावना संपूर्ण मंगळवेढेकर व्यक्त करीत आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने ताड कुटुंबामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.











