टीम लोकमन बंगळूर |
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हेग्गरे परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात राखीव पोलिस दलातील 3 उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. बंगळूरहून बळ्ळारीकडे प्रवास करणाऱ्या 5 पोलीस उपनिरीक्षकांची मोटार पुढे चाललेल्या ट्रकवर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, मोटार सुमारे 300 मीटरपर्यंत पुढे ओढली गेली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघातात अमरेश, मंजुनाथ आणि सचिन या 3 पोलिस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण आणि ईश्वर हे दोघे पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम चित्रदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना दावणगिरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधीक्षक रणजितकुमार बंडारू, हिरियूरचे उपअधीक्षक शिवकुमार तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार हे पाचही पोलिस अधिकारी बंगळूरहून बळ्ळारी येथे मित्राच्या लग्न समारंभासाठी जात होते.








