नांदेड : उज्ज्वला गुरसुडकर
कंधार तालुक्यात फुलवळसह बहाद्दरपुरा, मानसपुरी, घोडज, शेकापूर, फुलवळ, आंबूलगा, सोमासवाडी, मुंडेवाडी, कंधारेवाडी, पानशेवडी, गऊळ, जंगमवाडी, वाखरड, आदी परिसरात दि.९ एप्रिल २०२४ रोज मंगळवारी सायंकाळी ५ :०० वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाला सुरुवात होवून अक्षरशः थैमान घातले. या अचानक सुरुवात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, व हळद शिजवून सुकवण्यासाठी टाकलेल्या हळदीसह अन्य पिकांबरोबरच आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सध्या सर्वत्र हळद काढणे, ज्वारी काढणे,राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आसून कापलेल्या गव्हाचे काड,व ज्वारी पिक काढून शेतात उघड्यावरच असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेती पिकांचे तर नुकसान झालेच असून वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले ज्वारी पीक चक्क आडवे होऊन त्यांचेही नुकसान झाले आहे तर सध्या झाडांना लगडलेली कैरीसारखी आंबे गळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीकामासाठी शेतात असलेल्या हळद उत्पादक शेतकरी व कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच शेतात असलेल्या मुक्या जनावरांचे ही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावला असल्याच्या भावना व्यक्त करत वर्षभर राबराब राबून, मेहनत, काबाडकष्ट करून ज्याच्यावर आशेची शिदोरी असते तेव निसर्गाने आमच्याकडून हिरावून घेतले. तेंव्हा संसाराचा गाडा हाकावा तरी कसा अशाही भावना शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळत असून या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून हवालदिल झालेल्या बळीराजाला मदतीचा हात मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हळद उत्पादक शेतकरी व वीट उत्पादक यांची या अवकाळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून येत होते, या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या पावसामध्ये प्रचंड विजांचा कडकडाट ऐकू येत असल्याने व विजांचा लख्ख प्रकाश चमकत असल्याने शेतात काम करत असलेले महिला व पुरुष सरळ घराचा रस्ता धरून गावाकडे पळत येत असल्याचे दिसून येत होते.







