टीम लोकमन मंगळवेढा |
पती आणि पत्नी मधील नात्यांची विन हि अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारी असते. मी सारी जिंदगी माझी… तुला जपणार आहे… चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत. अशा काही अपवादात्मक घटना घडल्याचे कधीतरी कानावर पडते.
तळबीड मध्येही काल अशीच घटना घडली आहे. जीवनाचा जोडीदार असणारा व आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटांतच पत्नीनेही श्वास सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील तळबीड गावात गुरुवारी (दिनांक 21) रोजी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थही अचंबित झाले. दिनकर मारुती खोत (वय 97) व अनुसया दिनकर खोत (वय 90) असे निधन झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास दिनकर खोत यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांच्या अंतराने त्यांच्या पत्नी अनुसया यांनीही अखेरचा श्वास घेतला.
हाडाचे शेतकरी अशी दिनकर खोत यांची गावात ओळख होती. शेतीत काबाडकष्ट करून त्यांनी संसार फुलवला होता. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पत्नी अनुसया यांची शेवटपर्यंत त्यांना साथ लाभली. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर सून आणि दोन नातवंडांना त्यांचाच आधार होता. वयाच्या नव्वदी नंतरही त्यांनी एकमेकांना साथ दिली होती.
आजच्या समाजात पतीचे निधन झाले तर पत्नीचे आणि पत्नीचे निधन झाले तर पतीचे हाल होतात. हे विदारक चित्र आहे. मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही असे अनेकजण म्हणत असतात परंतु हे नाते किती काळ टिकणार? हे वेळेच्या हातात असते. परंतु तळबीड येथील घटनेने एकमेकांवर असलेल्या अपार प्रेमाची प्रचिती दिली आहे.
नातवांनी दिला मुखाग्नी
सदरची घटना कळताच तळबीड ग्रामस्थांनी खोत दांपत्याच्या घरी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. एकाच वेळी दोघांनी प्राण सोडल्याने नातेवाईक, पै- पाहुणे व गावकऱ्यांना गहिवरून आले. एकत्रित काढलेल्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले होते. शेजारी- शेजारी दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या आजी- आजोबांना नातवांनी मुखाग्नी दिला. शुक्रवारी त्यांचा रक्षाविसर्जन विधी पार पडला. मात्र या आकस्मित घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.