टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील शिक्षणाच्या क्षेत्रातील श्रध्देय नाव असेलेल सि.बा.यादव सरांच्या नावाने चालत असलेल्या या प्रतिष्ठांच्या कार्यक्रमाला यावं असं दोन-तीन वर्षापासून वाटत होते पण माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला आत्तापर्यंत येणे होत नव्हतं. पण यावर्षी या अत्यंत श्रद्धेय आणि उत्कृष्ट अशा उपक्रमाला उपस्थित राहत असताना मनस्वी आनंद होतो आहे. कारण ज्ञानाचं तेज काय असतं हे गुरूवर्य सि.बा.यादव यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं असे प्रतिपादन ह.भ.प. जयंत महाराज बोधले यांनी केले.
ते मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी दि.16 जून रोजी सकाळी दहा वाजता आयोजीत केलेल्या सि.बा.यादव प्रतिष्ठानचा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे होते.यावेळी व्यासपीठावर गुरूवर्य सि.बा.यादव, माजी मंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे, सुखदेव गरंडे (सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता, महा.जीवन प्राधिकरण), ज्ञानोबा फुगारे (माजी मुख्याध्यापक, जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढा), रघुनाथ नेने (सेवानिवृत्त प्राध्यापक, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली), अशोक कोळी (अध्यक्ष, श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर ट्रस्ट, मंगळवेढा) हे उपस्थित होते.
पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, मंगळवेढा ही साधू-संतांची भूमी आहे.येथील सर्व संतांचा इतिहास या ठिकाणी आल्यावर लगेचच डोळ्यासमोर येतो.अनेक संतांचा अवतार आणि कार्य ज्या भूमीमध्ये झालं अशी ही मंगळवेढा पवित्र भूमी आहे. अशा या महान भुमीत यादव सरांसारखे रत्न जन्माला आले हेही या भुमीचेच भाग्य म्हणावे लागेल. कारण आपल्या ओजस्वी आणि शिस्तप्रिय शिक्षणाने अनेक पिढ्या यशवंत बनवणारे सि.बा.यादव सर हे आदर्श व्यक्तिमत्व असून येणारा काळ नक्कीच यादव सरांच्या विचाराने प्रेरित असेल असेही शेवटी बोधले महाराज यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, आमची पिढी ही यादव सरांच्या हातखाली शिकली म्हणूनच आम्ही समाजात आज काहीतरी समाजहितासाठी करत आहोत. आपल्या शैक्षणिक कार्यकाळात यादव सरांनी खुप मोलाची कामगिरी केली असल्याने समाजातील अनेक पिढ्या आज यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहेत. याचे सर्व श्रेय यादव सर व त्यावेळच्या सगळ्या गुरूजनांचे आहे असेही शेवटी काळुंगे सर म्हणाले.
ह.भ.प. जयंत महाराज बोधले यांच्या शुभहस्ते यंदाच्या ‘सि.बा.यादव प्रतिष्ठानच्या ‘कृतिशील मुख्याध्यापक’ पुरस्कार’ चिदानंद भिमण्णा माळी (महात्मा गांधी विद्यालय, वाघोली ता.मोहोळ), ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मारुती नंदकुमार दवले (नगरपालिका कन्या शाळा नंबर १, मंगळवेढा), धनसिंग रेवू चव्हाण (जि. प. प्राथमिक शाळा, पटेल वस्ती, खुपसंगी), मनोज नायकवाडी (स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे-खालसा, हिवरे-कुंभार शिरुर, पुणे), काशिम अब्दुल पटेल (एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोड्डी) याना प्रदान करण्यात आला. तसेच दहावी परीक्षेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, जकराया शुगरचे चेअरमन ॲड.बी.बी.जाधव, निलाताई आटकळे, काँग्रेस कमीटीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार, जेष्ठ विचारवंत आ.गो.पुजारी, श्रीधर भोसले, माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, ॲड.रमेश जोशी, दत्तात्रय जमदाडे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा सत्कार श्रीधर भोसले यांनी तर प्रमुख पाहुणे ह.भ.प.जयंत महाराज बोधले यांचा सत्कार डाॅ.भिमाशंकर बिराजदार यांनी केला.त्यानंतर सुखदेव गरंडे यांचा सत्कार हजरत काझी, रघुनाथ नेने यांचा सत्कार ॲड.बापूसाहेब यादव यांनी तर अशोक कोळी यांचा सत्कार राजेंद्र माळी सर यांनी केला. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक मनोज गायकवाड, चिदानंद माळी यांच्यासह प्रमुख पाहुणे सुखदेव गरंडे व रघूनाथ नेने यांनीही आपले विचार मांडले.
तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाचे यादी वाचन शिवकुमार स्वामी यांनी तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पुरस्कार मानपत्राचे वाचन पंडीत खांडेकर यांनी केले.विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास संपुर्ण यादव, मोरे परिवार यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक बांधव तसेच जेष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यशस्वी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.भिमाशंकर बिराजदार यांनी केले. अध्यक्षीय सुचना संतोष दुधाळ यांनी मांडली त्या सुचनेस रामचंद्र हेंबाडे यांनी अनुमोदन दिले. या सुंदर अशा सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत घुले यांनी केले. आभार नितीन मोरे यांनी मानले व शेवटी डाॅ.शोभा पाटील तसेच सुरेखा साळुंखे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.









