टीम लोकमन मंगळवेढा |
दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. नव्या संसद भवनातील निलेश लंके यांचा आज पहिलाच दिवस होता. संसद भवनाच्या पायरीवर नतमस्तक होत निलेश लंके यांनी संसदेत प्रवेश केला.
संसदेत 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांचा अर्थात खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. दरम्यान आज निलेश लंके यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला.
निलेश लंके यांनी सभागृहात पाऊल ठेवताच पहिल्याच दिवशी आपले विरोधक सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभेची निवडणूक यंदा अतिशय चुरशीची झाली. येथे गेल्या अनेक दशकांची विखे-पाटील घराण्याची असलेली सत्ता निलेश लंके यांनी मोडून काढली. भाजपाच्या तिकीटावर लोकसभेसाठी दुसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांचा पहिल्यांदाच तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या निलेश लंके यांनी दणदणीत पराभव केला. परंतू नगरची हि निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. त्यातही एक मुद्दा जास्तच चर्चेत राहिला होता, तो म्हणजे उमेदवारांचे शिक्षण.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्या शिक्षणाचा मुद्दा पुढे करत त्यांना इंग्रजीतून भाषण करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी महिनाभर वेळ घ्यावा, पाठांतर करावे आणि बोलून दाखवावे, असे आव्हान विखे यांनी दिले होते. विखेंच्या त्या आव्हानाला लंकेंनी प्रचारादरम्यान सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिलेही होते. ‘समोरच्या उमेदवाराने माझ्यासोबत इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे. इंग्रजीतून बोलणे महत्वाचे नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठी माणसाचा आवाज उठविला. आपल्या जिल्ह्यातील दिवंगत नेते बबनराव ढाकणे यांचेही शिक्षण कमीच होते,’ असे प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान आपली बाजू सावरून धरली होती.
लोकसभा निवडणूकीत सुजय विखे-पाटील यांना 28 हजार मतांनी पराभव करून निलेश लंके यांनी मोठा विजय संपादित केला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी लोकसभेत पहिले पाऊल ठेवले. यावेळी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना सर्वांनाच अचंबित केले. निलेश लंके यांनी थेट इंग्रजीत आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लंके यांची ही कृती म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे.








