टीम लोकमन मंगळवेढा |
जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठान मंगळवेढा यांचेवतीने सन २०१७ पासून मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून एस.एस.सी. परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक शिक्षकांना प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यंदा हा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १६ जून रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले (धामणगावकर) यांच्या शुभहस्ते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता सुखदेव गरंडे, जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ज्ञानोबा फुगारे सर, सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक रघुनाथ नेने, मंगळवेढा येथील श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कोळी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या ‘सि.बा.यादव प्रतिष्ठानच्या ‘कृतिशील मुख्याध्यापक’ पुरस्कारासाठी महात्मा गांधी विद्यालय वाघोली ता.मोहोळ चे मुख्याध्यापक चिदानंद भीमण्णा माळी, ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी मारुती नंदकुमार दवले (नगरपालिका कन्या शाळा नंबर १, मंगळवेढा), धनसिंग रेवू चव्हाण (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पटेलवस्ती, खुपसंगी), मनोज नायकवाडी (स्वा.से.कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे-खालसा, हिवरे-कुंभार शिरुर, पुणे), काशिम अब्दुल पटेल (एम.पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सोड्डी) यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास माजी विद्यार्थी तसेच शिक्षक बांधवांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुरुवर्य सि. बा. यादव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.












