टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरामध्ये असंसर्गजन्य रोग तपासणी, कर्करोग तपासणी, गरोदर माता तपासणी, लहान मुलांची तपासणी, मुलांचे लसीकरण, रक्तक्षय, मासिक पाळी स्वच्छता, पोषण, रक्तदान शिबिर, क्षयरोग निदान व उपचार मोफत करण्यात येणार असून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्डही यावेळी काढण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुलोचना जानकर डॉ. रसिका कुलकर्णी, डॉ. स्मिता पाटील-नडगेरी, बालरोगतज्ञ डॉ. सुरज साठे, अस्थिरोग तज्ञ डॉ. विजय दत्तू, मानसोपचार तज्ञ डॉ. तेजस भोपटकर, स्किन हेअर व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. अमित मेनकुदळे, कान नाक घसा तज्ञ डॉ. प्रदीप गोडसे, फिजिशियन डॉ. प्रणव कदम, जनरल सर्जन व पोटविकार तज्ञ डॉ. महेश रोंगे, दंतरोग तज्ञ डॉ. वैशाली कोडलकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. विपुल कट्टे आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत.
रोटरी क्लब कडून रुग्णांना फळे वाटप…
या आरोग्य शिबिरासाठी मंगळवेढा शहरासह मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून त्यांना फळांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या संचालिका डॉ. सुलोचना जानकर असून सह प्रकल्प प्रमुख म्हणून मेजर चंगेजखान इनामदार, नारायण जाधव, प्रियांका शेजाळ, प्रियांका मर्दा आहेत. या उपक्रमाचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी कुलदीप रजपूत यांनी केले आहे.