टीम लोकमन मंगळवेढा |
नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर येथे शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी बालकातील जन्मजात व्यंग व आजाराचे मोफत निदान व समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शितल शहा यांनी दिली.
स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई, नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर, स्त्री आरोग्य संघटना आणि अग्रज हॉस्पिटल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकातील जन्मजात व्यंग व आजाराचे मोफत निदान व समुपदेशन शिबिर आयोजित केले आहे. शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. शीतल शहा यांचे नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर जि. सोलापूर येथे हे मोफत शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिनेतारका व नाट्य अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते व सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष करमरकर स्पायना बायफीडा एक्सपर्ट व पेडियाट्रिक सर्जन मुंबई, डॉ. स्नेहा सावंत मुख्य समन्वयक स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई, डॉ. शितल शहा सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ पंढरपूर, डॉ. महेश तळपल्लीकर पेडियाट्रिक सर्जन सोलापूर, डॉ. श्रीकांत कुलकर्णी बाह्य संपर्क अधिकारी जिल्हा रुग्णालय सोलापूर, डॉ. महेश सुडके वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, डॉ. सुनील कारंडे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर, डॉ. सुदेश दोशी अध्यक्ष स्त्री आरोग्य संघटना पंढरपूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बालकातील जन्मजात व्यंग व आजाराचे निदान व समुपदेशन या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शितल शहा यांनी केले आहे.









