टीम लोकमन पंढरपूर |
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावर्षी राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी थेट त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रवासातदेखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
गतवर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडल्या होत्या. या बसेसच्या माध्यमातून यात्राकाळात सुमारे 21 लाख भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती. यंदा यात्रा काळामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे.
वाहतुकीच्या नियोजनासाठी होणार एसटीची मदत…
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून राज्य परिवहन महामंडळाचे 36 पेक्षा अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.
यात्राकाळात येथून सुटणार एसटी बसेस…
चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भीमा यात्रा बसस्थानक देगाव : छत्रपती संभाजीनगर , नागपूर व अमरावती प्रदेश.
विठ्ठल कारखाना : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर.
पांडुरंग बसस्थानक : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग








