टीम लोकमन मंगळवेढा |
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य, दहावीचे व नववीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन उत्तम रित्या केले. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत एक छोटीशी भेट वस्तू दिली.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत विविध करिअर संधींबाबत माहिती दिली तसेच आगामी दहावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे प्रा.सुधीर पवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून आभार प्रदर्शन करण्यात आले.
प्रशालेचे विश्वस्त व राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्था सोलापूरचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्ष व मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अत्यंत आनंददायी, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभ संपन्न झाला.








