टीम लोकमन मंगळवेढा |
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून शालिनी सिंग (प्रॉडक्ट मार्केटिंग मॅनेजर ,केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस असेसमेंट) व आकाश चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांचेहस्ते अतिथींचा यथोचित सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
शालिनी सिंग यांनी एन. सी. पी, एन.सी.एफ, 3 एच थेरी, बहुविध बुद्धिमत्ता, शिक्षण कौशल्य व इतर विविध तंत्र, शिक्षक व विद्यार्थी यांची अंतर क्रिया कशी असावी? शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा? सध्याचे तंत्रज्ञान व शिक्षण प्रक्रिया यामध्ये होणारे बदल, केवळ गुणांना महत्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला, कलागुणांना वाव द्यावा अशा विविध प्रश्नांवर उपस्थित प्रशालेतील शिक्षकांशी चर्चा केली. वर्ग नियंत्रण करण्यासाठी विविध टेक्निक्स त्याचप्रमाणे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्यासाठी काय करता येईल ? विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करावे? यासाठी विविध उपाय त्यांनी प्रस्तुत केले. कोणत्या वर्गाला कशा प्रकारचे अध्यापन तंत्र वापरावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षकांना वर्गावर नियंत्रण प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक धोरणे मिळाली. या कार्यक्रमादरम्यान मिळालेले ज्ञान आणि कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आणि अनुकूल शिक्षण वातावरण तयार करण्यास नक्कीच हातभार लावतील. डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.