टीम लोकमन मंगळवेढा |
घरात एकटीच असलेल्या तरुणीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना वरोरा येथील आनंदवन परिसरात बुधवारी रात्री घडली आहे. या तरूणीची आई तिच्या अंध वडिलांना सेवाग्राम येथे उपचारासाठी गेली होती नेमके त्यादरम्यानच तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरती दिगंबर चंद्रवंशी (वय 24) असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे. आरती ही घटस्फोटित होती. तिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु काही दिवसांपासून ती माहेरी वास्तव्याला होती. बुधवारी वडील बाबूलाल सूर्यवंशी आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे उपचारार्थ गेले होते. आई-वडील उपचार करून घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिच्या गळ्यावर शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हेदेखील घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या वडिलांची विचारपूस केली.
24 तासांच्या आत आरोपीला बेड्या…
याप्रकरणी गुरुवारी वरोरा पोलिसांनी वेगाने तपास करून 24 तासांच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी समाधान माळी (रा. चोपडा, जळगाव ह. मु. वरोरा) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्याची पद्धत व हेतू निष्पन्न करण्याकरिता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.







