अभिजीत बने
‘ऋण’ म्हणजे कर्ज आणि ‘अनुबंध’ म्हणजे नाते. या शब्दांचा मिलाफ होऊन जो हा ‘ऋणानुबंध’ शब्द गुंफला गेला आहे, त्या शब्दाचा समर्पक वापर ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… भेटीत तृष्टता मोठी…’ या गीतात गीतकार बाळ कोल्हटकर यांनी केला आहे.
ज्या व्यक्तींशी आपले जन्मोजन्मांतरीचे नाते जुळले आहे. अशी भावना जेव्हा मनात दृढ होते तेव्हा ऋणानुबंधाच्या गाठी दोन मनाशी जोडल्या जातात आणि जेव्हा एकमेकांच्या ऋणात राहताना जेव्हा भेट होते तेव्हा या भेटीची दृष्टता खूप मोठी असते. मनात आठवणीचा डोह जेव्हा उचंबळून येतो, तेव्हा मनाची होणारी अवस्था ही मनात प्रचंड हुरहुर उत्पन्न करते. जेव्हा ऋणानुबंधाची हि भेट होते, तेव्हा या भेटीचा सर्वोच्च आनंद अनुभवताना ओठावर अनेक आठवणींचे हितगुज थरथरत असते. अनेक स्मृती ओठांवर येऊन थबकलेल्या असतात. या सर्व आठवणी मनाला कातरून सोडतात. मनाला अस्वस्थ करून सोडतात.
भेटी गाठीतून नात्यांची विन अधिकाधिक घट्ट होत जाते त्यामुळे नात्यात भेट होणे गरजेचे आहे नाहीतर या नात्याची विनंती एकेरीच राहते मोठा दुरावा सहन करून जेव्हा ऋणानुबंधाची ही भेट घडते तेव्हा तू क्षण मर्मबंधातली ठेव म्हणतो आणि ही मर्मबंधातली ठेव मग ह्रदयात जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत कायम जपली जाते ऋणानुबंधाची ही भेट जेव्हा घडून येते तेव्हा नाती एकमेकांत मध्ये हरवून जातात ज्या आठवणी राहून गेलेल्या आहेत त्यांना उजाळा दिला जातो.
या भेटींमध्ये इतकी तृष्टता असते की त्यात जपल्या गेलेल्या अनेक सुखदुःखांच्या आठवणीने कधी गहिरायला होते, तर क्षणात धुसफुसायला होते. आठवणींच्या तारा या भेटीत छेडल्या जातात. आणि अगदी अशाच आठवणींच्या तारा मरवडेकर कुलकर्णी परिवाराच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने छेडताना पाहायला मिळाल्या. ऋणानुबंधाच्या जपणुकीचा एक वेगळा मिलाप यानिमित्ताने अनुभवता आला.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील कुलकर्णी परिवार आणि आप्तेष्ट यांनी कुलकर्णी परिवारातील ज्येष्ठ पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा आयोजित करून कुलकर्णी परिवाराच्या एकीचे दर्शन दिले. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कुलकर्णी परिवाराने नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याचे काम केले आहे. हा स्नेह मेळावा मंगळवेढा तालुक्यासाठी आदर्श असाच ठरलाच परंतु ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी….’ या गाण्याची आठवण करून दिली.
सावित्री मंगल कार्यालय मरवडे येथे दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2025 रोजी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेला कुलकर्णी परिवार उपस्थित होता. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे सर्व कुटुंब एकत्र आणुन त्यांना त्यांच्या नातेसंबंधातील ओळख व्हावी. परस्परांमध्ये जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी वृध्दिंगत व्हावी. हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी दुपारी 3 वाजता आलेल्या पाहुण्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यात अबालवृद्धांची लेझिम, लाठीकाठी आणि तलवार बाजीच्या प्रात्यक्षिकांसह सर्वाची मने जिंकली. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी यांनी कार्यकारिणीच्या सदस्याचा सत्कार केला. आणि आपल्या मनोगतातून मरवडेकरांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. चहापानानंतर कुटुंबातील सर्वासाठी टास्क चे आयोजन करून वेगळीच धमाल करण्यात आली. तर रात्रीच्या सत्रातील विविध कलागुणदर्शनात कराओकेची गाणी, रेकार्ड डान्स, रिमिक्स डान्स, भावगीते, भक्तिगीते, पोवाडा, भरतनाट्य, आणि जय मल्हार या दूरदर्शन मालिकेतील हुबेहुब व्यक्तिरेखा साकारत खंडोबाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नंतर रात्रीच्या गावरान भोजनाचा परिवारांनी आस्वाद घेतला.
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळ सत्रातील शाखेच्या आयोजनानी कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिवाराने योगप्रशिक्षणातून सूर्यनमस्कार,योगनिद्रा आणि झुंबा नृत्यप्रकारातून शारीरिक हालचालींनी महिलांना व्यायामाचे महत्व विषद केले. अल्पोपाहारानंतर मरवडेकर परिवाराच्या जुन्या आठवणीने शब्द बध्द केलेली,” एकोपा” या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी माजी शिक्षणाधिकारी डी. वाय. कुलकर्णीसाहेब, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार गुरुजी, माजी शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी साहेब, पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी, विनायक कुलकर्णी, विद्याधरराव जोशी, गुंडोपंत कुंभारे, श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, संपादक राज कुलकर्णी सर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी परिवारातील महिलांनी आपल्या लघुउद्योगातून बनविलेले विविध खाद्यपदार्थ आणि हस्तकलेतून आकाराला आलेल्या वस्तूचे स्टाॅल लावण्यात आले. तर फनिगेम्सनीमुळे महिलांना एक वेगळाच आनंद घेता आला. नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तर शेवटच्या सत्रातील टास्कमुळे, विविध हिंदी मराठी गाण्यांच्या अंत्याक्षरीनी परिवारांना वेगळाच आनंद घेता आला. तर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि आप्तेष्ट यांनी आपले मनोगत मांडत मरवडेकराचा स्पेशल चहा घेत घेत या स्नेहमेळाव्याची गोडी जिभेवर रेंगाळत ठेवली. कुणी सेल्फी पाॅईंटवर आपली छबी काढण्यात मग्न होते. तर कुणी जुन्या वस्तू हाताळत होते. शेवटी सर्वांच्या सामुहिक फोटोने संपूर्ण मरवडेकर कुलकर्णी परिवार एकाच फ्रेममध्ये कैद झाला. या दोन दिवसाच्या स्नेह मेळाव्यातील आठवणींची शिदोरी कायम सोबत घेऊन या पसायदानाने स्नेहमेळ्याची सांगता झाली.