टीम लोकमन मंगळवेढा |
देशाची राजधानी नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. 70 जागा असलेल्या विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर गेल्या 3 निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे.
दिल्लीतील निवडणुक ही भाजप विरुद्ध आप अशीच झाली होती. पण या शिवाय अन्य काही पक्ष देखील या निवडणुकीत उतरले होते. ज्यात काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता.
एकेकाळी दिल्लीवर सत्ता असलेल्या काँग्रेसला पुन्हा जोरदार झटका बसला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीत सत्तेत असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीतील 70 पैकी 23 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र यापैकी एकालाही विजय तर सोडाच पण डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. आतापर्यंत झालेल्या मतमजोणीत राष्ट्रवादीला फक्त 0.03 टक्के मते मिळाली आहेत. दिल्ली निवडणुकीत नोटाला 0.57 टक्के इतकी मते मिळाली असून राष्ट्रवादीला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा अतिशय लाजिरवाणा पराभव मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने याआधी ही महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यांना कधीच फार यश मिळाले नव्हते. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील ते मैदानात उतरले होते. परंतु तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नव्हती. जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षाची विभागणी झाल्यानंतर दिल्लीत होणारी ही पहिली निवडणूक होती.
महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीत मात्र युती न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे दिल्लीत पक्ष वाढवण्याचे कारण होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा मोठा धक्का बसला आहे. ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांचा भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभव केला.







