टीम लोकमन मंगळवेढा |
संगीताचा नाद वा ध्वनी इतका अथांग सागराहुनही अनंत आहे हे सांगणे म्हणजे काही नवल नाही अनेक जाणकारांनी सांगून ठेवले आहे. चराचर प्रकृतीला चालवणारा अनाहत नाद आणि इतर प्रकृती मधून निघणारा आहात नाद या परस्पर पुरक नादामुळेच या सृष्टीचे चलन अविरत सुरु आहे यात शंका मुळीच नाही असेही म्हणतात. झाड, वेल, पान, फुल, बाग, बगिया असो की पशु, पक्षी, प्राणी, जलचर या उभयचर सर्वांना नादाने एक सूत्रात बांधून घेतलेले आपण पाहतोय. रंग, रूप, रस, गंध, सुगंध या सर्वांचे प्रकटीकरण सुद्धा नादामुळेच होते हेही किती मजेदार कोडे आहे पहा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना आपल्या कार्यात गती घेण्यासाठी अनहद नाद सहाय्यक ठरतो तर या पंच महाभूत द्वारे उत्पन्न असणाऱ्या वरील विविध गोष्टींना, वस्तूंना गतीशिलतेने वाढण्यासाठी आहात नाद कारण ठरतो असा सिद्धांत आहे.
या सिद्धांतानुसार चालण्यासाठी म्हणून संगीत विषयाचे विविध रीतीने प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व विद्यापीठ कार्यरत
आहेत त्यापैकीच आपल्या मंगळवेढ्यातील अनेक शाळांपैकी एकमेव शाळा म्हणजे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा. ही मंगळवेढा पंचक्रोशीतील एकमेव प्रशाला आहे. जिथे संगीत हा स्वतंत्र विषय असून संगीताचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते आणि विद्यापीठाचे प्रमाणपत्र व परिशिष्ट द्वारे इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुण वाढीसाठी ही प्रस्तावित केले जाते.
दरवर्षी सरासरी दहा विद्यार्थी तर याचा लाभ घेतात. दरवर्षी प्रशालेतील विद्यार्थी प्रथम क्रमांक व विशेष योग्यता या मानांकनात यशस्वी होतात तसे चालू वर्षी “२०२५-२६” या शैक्षणिक वर्षात नोव्हेंबर सत्रातील भारती विद्यापीठ पुणे (स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) अंतर्गत झालेल्या शास्त्रीय संगीताच्या परीक्षेमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपले संगीत विषयातील योगदान देत घवघवीत यश मिळवले आहे. यावर्षीचा संगीत परीक्षेतील निकाल हा १००% आहे.
संगीत शिक्षक, संगीत विशारद प्रा. कल्पेश कांबळे यांच्या मार्गदर्शन अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी यशस्वीतांचे कौतुक करण्यात आले व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांनी यशस्वीतांचे विशेष अभिनंदन केले.






