जत : पांडुरंग कोळळी
जत तालुका कृषी विभागाकडून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू असून या विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दिली आहे.
तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवार दि. २ जुलै रोजी जत तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल. बसवेश्वर चौक ते तालुका कृषी कार्यालय दरम्यान मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे.
जत तालुक्यातील शेतकरी हा दुष्काळाने पिचला आहे. कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना सोयी सवलती व योजनांचा लाभ देण्यात कृषी विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेच नाहीत. ठराविक लोकांची कामे करण्यात व उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण करण्यात अधिकारी मग्न आहेत. शासनाकडून आलेले बियाणे व खते शेतकऱ्यांना न पोहोचविता ते घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. बियाणांच्या पिशव्या घेऊन जाण्यासाठी प्रवास खर्चावरच शेतकऱ्यांचा ज्यादा खर्च होत आहेत.
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. रोजगार हमी योजनेची कामे करण्यात टाळाटाळ केली जात आहे. कागदपत्रे देऊनही शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात. टक्केवारीची कामे केली जातात. सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कृषी विभागाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र कृषी दिनाच्या दिवशीच कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारण्यात येणार आहे असे तम्मनगौडा रविपाटील यांनी सांगितले.








