टीम लोकमन सोलापूर |
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची ज्या ठेकेदारांकडे कामे जास्त मंजूर आहेत पण ते इतर ठेकेदारांकडून काम करुन घेत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची कामे मुदतीत पूर्ण करुन घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन संबंधित ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकली जाणार आहेत. शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे. कार्यतत्पर सीईओ मॅडम आक्रमक झाल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत. या ३७ ठेकेदारांकडे जिल्ह्यात एकूण ४५५ कामे मंजूर आहेत. परंतू हे ठेकेदार सदरची कामे स्वतः न करता इतर ठेकेदारांना कामे देऊन त्यांच्याकडून करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठेकेदारांचे जल जीवन मिशन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी पुरवठा योजनांची कामे दिलेल्या विहित वेळेत पूर्ण न होता उलट खूपच विलंब होत आहे.
त्यामुळे या ३७ ठेकेदारांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लेखी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला संबंधित ठेकेदारांनी समर्पक असा वेळेत खुलासा न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन संबंधित या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकली जाणार आहेत.
जिल्ह्यात सध्याच्या टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये ज्या गावास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची वेळ आली तर संबंधित ठेकेदारांकडून त्या टँकरचा खर्च वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर जिल्हा परिषद गुन्हे सुद्धा दाखल करणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येत आहेत. परंतू सदरची झालेली जी कामे आहेत ती तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तेने असमाधानकारक आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना तोंडी व लेखी सुचना देऊन पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्तेनी करावीत याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
तसेच आगामी आषाढी वारीमध्ये जिल्ह्यातील सर्व पालखी मार्गावरील गावामध्ये वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचीही दक्षता घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.










