टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या. लोकांना योजनेचा लाभ मिळू द्या. कामांचे दर्जावर लक्ष ठेवा. पाणी गुणवत्ता सांभाळा. गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा असे आवाहन केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाळ शेठी यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी आज जिल्हा परिषदेस भेट देऊन जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट दिली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक लेखा बापू शेंडगे यांच्यासह उपअभियंता योगीराज बेंबळगी, नाबार्डचे महेश शिरपूर, पी. एच. कुलकर्णी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, शाखा अभियंता जयवंत जाधव, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव यांनी करून सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कामांची माहिती दिली. निधी अभावी अनेक कामांचे प्रगतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व जलजीवन मिशनच्या कामांची परिपूर्ण माहिती देऊन फोटोसह सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शनाखाली योजना पुर्णत्वास नेत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव यांनी सांगितले.
बिबीदारफळ ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी सरपंच अर्चना विठ्ठल ननवरे, उपसरपंच नारायण सर्वगोड उपस्थित होते. गावातील पाण्याची विहीर व पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली. बीबीदारफळ तलावातून अकोलेकाटी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणारे योजनेची पाहणी शिष्यपाल शेठी यांनी केली.
दिड किलोमिटर पायी चालून केली पाहणी…
केंद्र शासनाचे वाॅश सल्लागार शिष्यपाल सेठी यांनी दीड किलोमीटर पायी चालत योजनेची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात महिलाकडून पाणी नमुने तपासून घेतले. पाणी पुरवठा योजनेची नळ कनेक्शनची पाहणी केली. पाणी सोडायला सांगून पाण्याचा दाब विचारून घेतला. गावातील पाण्याची गरज ओळखून योजना लवकर पुर्ण करा असे सांगून पाईप, टाकीचे बांधकाम, विहिरींचे बांधकाम पाहिले. विहिरीची पाणी पातळी पाहून सुखावून गेले. दीड किमी अंतर पायी चालत तलावातील विहीर व पाईप लाईनची चारी जेसीबीने खोदून पाहणी केली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व कामांची परिपूर्ण माहिती दिली. उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी इंग्रजी व हिंदीतून सोलापूर जिल्हा दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत वारंवार बदलत असल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बीआरसी मोनिका दिनकर, आम्रपाली गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली. पाणी गुणवत्तेची माहिती सोनाली कुलकर्णी यांनी दिली.