टीम लोकमन मंगळवेढा |
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना ईव्हीएम मशिनला हार घालणे चांगलच महागात पडलं आहे. कारण त्यामुळे शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तहसीलदाराने तक्रार दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराज यांनी आज त्र्यंबकेश्ववर येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनला हार घातला होता. तसेच यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले होते. शांतिगिरी महाराजांच्या या कृतीवर त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार ठकाजी वामन महाले यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईव्हिएम मशीनला हार घातल्याच्या घटनेवर आक्षेप घेत तहसीलदार ठकाजी वामन महाले यांनी शांतिगिरी महाराज यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत ईव्हिएम मशीनला हार घालून गैरवर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाले यांनी केली होती. या तक्रारीनंतर शांतिगिरी महाराज यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कलम 186, कलम 188, कलम 131 आणि कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ईव्हिएम मशीनला हार घालणं शांतिगिरी महाराजांना चांगलचं भोवलं आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शांतिगिरी महाराज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय, आम्ही मतदानाच्या यंत्राला हार घातला नाही. हार पुठ्याला घातला आहे. त्या पुठ्यावर भारत मातेचा फोटो होता. कव्हरवर भारत मातेचं चित्र होतं. म्हणून त्या भारत मातेला आम्ही हार चढवला होता. पुजा केली नाही, असे शांतिगिरी महाराज यांनी म्हटलं आहे. या गुन्ह्याला आता आमची कायदेशीर टीम उत्तर देईल, असे शांतिगिरी महाराज यांनी म्हटलं आहे.










