टीम लोकमन मंगळवेढा |
विधानसभा सदस्याच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. विधानपरिषदेच्या अकरा जागा रिक्त असून, त्यातील पाच जागा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहेत.
केंद्रीय नेतृत्वाने पाच नावे निश्चित केली आहेत. लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला आहे. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने उमेदवारी जाहीर करताना सामाजिक समिकरणेही जुळवल्याचे दिसत आहे. ओबीसी नेत्यांबरोबर दलित समाजाला उमेदवारी दिली आहे. यातील अमित गोरखे हे नवे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत. ते भाजपच्या आयटी सेलचे ते काम पाहतात. ते दलित समाजातून येतात. पुण्यातून योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. टिळेकर हे भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.
तर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपने स्वतःच्या कोट्यातून खोत यांना उमेदवारी दिली आहे. तर डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी मिळाली असून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. फुके हे भंडारा जिल्ह्यातील आहेत.







