टीम लोकमन मंगळवेढा |
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा स्वगृही शरद पवारांसोबत येताना दिसत आहेत. त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.
माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. शिंदे यांचा पक्षप्रवेश रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी चळवळीत काम करत आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती.
शरद जोशी यांना प्रेरणास्थान मानून भानुदास यांनी दौंड तालुक्यासह राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. भानुदास शिंदे हे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. शरद जोशी तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी अतिशय उठावदार काम केले आहे. भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने दौंडमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढली असून भाजप आमदार राहुल कुल यांच्यासाठी देखील हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शरद पवारांचे उपमुख्यमंत्री अजितदादांना धक्क्यांवर धक्के
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
प्रवीण माने यांच्या शरद पवार गटातील प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. माने यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने इंदापूर तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात तुतारी वाजणार असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. यापुढेही असे अनेक धक्के महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळणार आहेत.