टीम लोकमन मंगळवेढा |
भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मोठा धक्का बसलाय. सांगलीत भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला राम राम केला आहे.
इतकेच नाही तर चारही नगरसेवक सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार असलेल्या विशाल पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताच चारही नगरसेवकांनी विशाल पाटलांचा जोरदार प्रचार सुरु केलाय.
मिरज मधील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याच्या कारणातून भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून भाजपमधील आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्याबद्दल मिरज येथील भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघडपणे आता समोर येताना दिसत आहे.
संजय काकांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपला एकावर एक असे धक्के बसत आहेत जतचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी यापूर्वीच संजय काकांच्या उमेदवाराला विरोध करत भाजपचा राजीनामा देऊन विशाल पाटलांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे त्यानंतर आता मिरजेतील नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून विशाल पाटलांचा लिफाफा हाती घेत प्रचारात सक्रिय झाले आहेत त्यामुळे संजय काकांना हा मोठा धक्का मानला जात आहे आता ही निवडणूक संजयकाकांसाठी सोपी राहिली नसून त्यांना आता अस्तित्वासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे काँग्रेस कडून लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने विशाल पाटील नाराज होते त्यांनी बंडखोरी करत आपला मोठे शक्ती प्रदर्शन व गाजावाजा करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते महाविकास आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगत असले तरी अजून ते फारसे प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. विशाल पाटील गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभेसाठी तयारी करत होते. मात्र, महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारणामुळे त्यांचं तिकीट कापल्या गेलं असल्याची चर्चा आहे.
यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असून काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते जरी आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत असले तरी कार्यकर्ते मात्र विशाल पाटलांसोबत असल्याचे चित्र दिसत आहे विशाल विशाल पाटलांना वाढत असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांचा लिफापा दिल्लीत पोहोचणार का याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना आहे.
भाजपने संजयकाका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाने अचानकपणे ट्रीपल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सांगली लोकसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून भारतीय जनता पार्टी अर्थात संजय काकांसाठी प्रतिष्ठेची असून विशाल पाटलांच्या अर्थात वसंतदादा घराण्याच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. यामुळे सांगली लोकसभेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








