टीम लोकमन मंगळवेढा |
विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जोरदार पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.अशातच आता जयंत पाटील यांनी बुधवारी केलेल्या केलेल्या वक्तव्यामुळे जयंत पाटलांच्या मनात काय चाललंय अशा चर्चांना उधाण आल आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली असली तरी सत्ताधाऱ्यांनी यावरून आपले अंदाज व्यक्त केले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते. यावेळी, मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टींबाबत सदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. तुम्हाला माझ्याबाबत शंका असल्यानं हमी देणं धोक्याचं आहे. राजू शेट्टींना आघाडीकडून उभं रहा असं त्यांना सांगत होतो. पण माझ्याबद्दल शंका होती, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.
नाराज जयंत पाटील निर्णयाप्रत आले आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 मध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी जयंत पाटलांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार निवडून आले. मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. तर शरद पवारांच्या पक्षाचं पानिपत झालं. त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चाही अधूनमधून सुरू असतात. आता जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्याची री ओढत सत्ताधाऱ्यांनी आपले अंदाज वर्तवलेत.
पक्ष सोडणार का? अखेर जयंत पाटलांनी दिले उत्तर…
परवाच्या कार्यक्रमात मी राजू शेट्टी यांना उद्देशून एक विधान केले. आमच्याबरोबर राहिला असतात तर लोकसभेत दिसला असतात. शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न तुम्ही देशाच्या संसदेत मांडला असतात. पण त्यांचेच पूर्वीचे वक्तव्य पाहता माझ्यावर विश्वास ठेवू नका असे मी म्हणालो. याचा अर्थ मी कुठे प्रवेश करणार, राष्ट्रवादी सोडणार असा होत नाही. तसे अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाहीये, असे जयंत पाटील म्हणाले.







