टीम लोकमन |
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी जवळील कोगनोळी चेकपोस्ट जवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर शहरातील तरुण उद्योजक दांपत्याचा मृत्यू झाला आहे. जिगर किशोर नाकराने (वय 24) आणि त्यांची पत्नी ऋतिका जिगर नाकराने (वय 24) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सुदैवाने त्यांच्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मात्र जीव वाचला आहे.
या दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरात शोककळा पसरली आहे. जिगर आणि ऋतिका हे मूळचे कच्छ (गुजरात) येथील असले तरी गेल्या काही वर्षांपासून ते कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते. जिगर नाकराने हे प्लायवूड, लाकडी दरवाजे आणि संबंधित साहित्य निर्मितीचा व्यवसाय करीत होते. कागल येथील फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचा व्यवसाय चालू होता.
सामुदायिक विवाह सोहळ्यातून परत येताना झाला अपघात…
शुक्रवारी सकाळी हे दांपत्य आपल्या आठ महिन्यांच्या वृष्टीसह कारने हुबळी येथे गेले होते. तेथे त्यांच्या समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम आटोपून दुपारी चारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे परत निघाले होते. कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पावतीसाठी थांबलेल्या कंटेनरला त्यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली. भरधाव वेगामुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या. पुढील सीटवर बसलेले जिगर आणि ऋतिका गंभीर जखमी झाले. मात्र मागील सीटवर पाळण्यात झोपलेली लहानगी वृष्टी मात्र सुरक्षित राहिली. कारचा मागील भाग तुलनेने सुरक्षित राहिल्याने तिला किरकोळ दुखापतीच झाल्या.
उपचार सुरू असताना जिगर आणि ऋतिकाची मालवली प्राणज्योत….
घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल करणाऱ्या आवताडे कंपनीचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार परमानंद मारुसेठ आणि मंजुनाथ कल्याणी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिकाचा मृत्यू झाला तर मध्यरात्रीच्या सुमारास जिगर यांची प्राणज्योत मालवली. आठ महिन्यांच्या चिमुकल्या वृष्टीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पंचगंगा स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार…
या प्रकरणी जिगर यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल (इचलकरंजी) यांनी कंटेनर चालक इम्तिहास अनवर अली (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिगर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि आठ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. ऋतिकाचे माहेर सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी आहे.








