टीम लोकमन पंढरपूर |
पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत असून गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेव मंदिरात 3 महाराज अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज अशी नदीपात्रात अडकलेल्या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तिघेजण महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला.
आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु
त्यानंतर तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत. मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचलेले नाही. मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. पुढील काही वेळेत त्यांना सुरक्षित बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.
अकलूजमध्ये नीरा नदीचे उग्र रूप, अकलाई मंदिरात पाणी
अकलूजमध्ये ऐन मे महिन्यात नीरा नदीचे उग्ररूप पाहायला मिळत आहे. मे महिन्यात कायम कोरडी पडणारी नीरा नदी आज दुथडी भरून वाहू लागलेली आहे. आज सकाळी अकलूज येथील अकलाई मंदिरात पाणी शिरले आहे. नीरा नदीच्या काठावर असणाऱ्या या अकलाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आज अमावस्येच्या निमित्त दर्शनाला आलेल्या अकलूजकरांनी नीरेचे हे रौद्ररूप पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ज्या मे महिन्यात पक्ष्यांनाही प्यायला पाणी नसते तिथे नदीच्या पाण्याचे असे उग्ररूप कधीच पाहायला मिळाले नव्हते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
माळशिरस तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका
माळशिरस तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला असून गेल्या दहा दिवसात 256 मिलिमीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांश बंधारे हे पाण्याखाली बुडून गेले आहेत. तालुक्यातील ओढे, नाले ओव्हर फ्लो होऊन वाहत असून दहिगाव येथील पुलावर जवळपास चार ते पाच फूट पाणी आज सकाळी होते. आता पाणी ओसरल्याने येथील वाहतूक सुरू झाली असली तरी अजूनही काल पडलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात या ओढ्याला येऊन मिसळताना दिसत आहे. या ओढ्याच्या परिसरात असलेले भराव पाण्याच्या वेगाने खचले असून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.







