टीम लोकमन मंगळवेढा |
लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून दीड वर्षांपासून फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी उद्योजिका अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून सीआयडीच्या पथकाने अटक केली आहे.
गतवर्षी कुटे ग्रुपच्या सर्वच समुहांवर आयकर विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटे यांची सर्व प्रतिष्ठान सील करण्यात आली होती. ‘द कुटे ग्रुप’वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या व्यवहारावर झाला होता. मोठ्या प्रमाणात ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या होत्या.
यावेळी पॅनिक होऊ नका, शांततेत घ्या, कुटे ग्रुपला लोन मंजूर झाले आहे. अशी दिशाभूल करणारी वक्तव्य करत ठेवीदारांना झुलवत ठेवणार्या कुटे ग्रुपने आपल्या ठेवीदारांना एक रूपयाही दिला नाही. अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचार्यांवर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले.
जून 2024 मध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबत अर्चना कुटे एसपी कार्यालयात आल्या होत्या. परंतू तत्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर यांनी अर्चना कुटे यांना पाठिशी घालण्याचे काम केले होते. पोलिसांच्या आशीर्वादावर तब्बल वर्षभर पुणे, मुंबई, महाबळेश्वर अशा ठिकाणी मौज मजा करत फिरणार्या अर्चना कुटे यांना अखेर सीआयडीच्या पथकाने पुणे शहरातील पाषाण रोड भागातून अटक केली आहे. त्यांच्यासोबत आशिष पाटोदकरच्या आईला देखील पोलिसांनी अटक केली आहे.