टीम लोकमन मंगळवेढा |
माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा पहिल्यापासूनच दबदबा राहिला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांनी कोल्हापूरचा गड कायम राखण्यासाठी आता कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याचा विरोधकांची चांगलाच धसका घेतला आहे. कारण राजकीय चाणक्य पवारांच्या या कोल्हापूर दौऱ्यात महायुतीचे अनेक बडे नेते पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांना चांगलाच घाम फुटला असून पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय समरजीत घाटगे तुतारी फुंकणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजित घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात कोण मातब्बर असणार? याची चर्चा आणि प्लॅनिंग की देखील होणार आहे. शिवाय राधानगरी विधानसभा मतदारसंघात कुणाला संधी मिळेल याचीही रणनीती ठरेल. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी किती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार? हा विषय कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे.
संपूर्ण देशाला राजकीय चाणक्य म्हणून परिचित असणारे शरद पवार राजकारणात कधी काय करतील याचा नेम नाही. विरोधकांना गाफील ठेऊन धोबीपछाड देण्यात शरद पवार माहिर आहेत. आता कोल्हापूरच्या आखाड्यात पवार नेमका कोणता डाव टाकतात याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत. मात्र, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.








