टीम लोकमन मुंबई |
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितले आहे. अशोक खरातला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले होते. ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड. रूपाली ठोंबरे या दोन्ही नेत्या चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना वर्षा निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
रुपाली चाकणकर यांची पोस्ट
याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही असा दावा त्यांनी केला आहे. आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
“आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले,” असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.







