टीम लोकमन |
राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून उद्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना मोठा वेग आला असून उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली असून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले होते. वर्षावर बैठक झाली आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये गट नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे? गट नेता कशा पद्धतीने निवडायचा या सर्व गोष्टींवर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे.







