टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने घेण्यात येणारे फेर मतदान रोखण्यात आले होते. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोपही करण्यात आला आहे. बीएनएस 353 (1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावातील या आरोपीवर दाखल केले गुन्हे?
1) संजय हरिभाऊ वाघमोडे
2) राजेद्र अंकुश मारकड
3) वैभव वाघमोडे
4) विजय वाघमोडे
5) विलास आद्रट
6) रणजित जिजाबा मारकड
7) लक्ष्मण सिताराम मारकड
(8) सर्जेराव बाबुराव लोखंडे
(9) संदिपान आण्णा मारकड
10) अमित वाघमोडे
11) दत्तु राघु दडस
12) आबा नाना मारकड
13) बबन दादा वाघमोडे
14) मारुती शंकर रणदिवे
15) नानासाहेब मारकड
16) संजय नरळे
17) शरद कोडलकर.
सर्व राहणार मारकडवाडी.
18) इतर 100 ते 200 लोक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
मारकडवाडीतले मतदान रोखल्यावरुन नाना पटोलेंनी एका पत्रकातून जोरदार टीका केली. “मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मारकडवाडी गावात नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकरांना कमी मते मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचे एकूण मतदान 2 हजार 476 आहे. विधानसभा निवडणुकीत 1 हजार 905 मतदान झाले. यापैकी 1003 मते राम सातपुते यांना पडली तर 843 उत्तम जानकर यांना पडली. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.









