टीम लोकमन पुणे |
पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली असून पुण्यामधील चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने दहा ते पंधरा गाड्यांना उडवले आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून काहींचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामधील चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने 10 ते 15 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक दुचाकी, चारचाकी, कार व पायी चालणाऱ्या प्रवाशांना कंटेनर चालकाने चिरडले आहे. अपघात करून महामार्गावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडले आहे. त्यानंतर त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या ट्रक चालकाने सुरुवातीला चाकण शिक्रापूर रस्त्यावर दहा ते पंधरा गाड्यांना ठोकर दिली. चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले. मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरु केला. हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते तेंव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले आहे.
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या मालवाहतूक कंटेनर चालकाचा प्रताप सुरु होता. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर अपघाताचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.










