टीम लोकमन सांगोला |
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला पुन्हा धक्का जोरदार दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे आज शुक्रवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते मशाल हाती घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. दीपकआबा घड्याळ सोडून हातात शिवबंधन बांधणार असल्याने या पक्षप्रवेशाकडे सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा आज दुपारी तीन वाजता प्रवेश होणार आहे. त्यामुळे आता सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. सांगोला हा पारंपारिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत दीपकआबा साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.
जर महाविकास आघाडीने अन्याय केला तर आम्ही सांगोल्यात लाल बावटा फडकावून दाखवू असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अनिकेत देशमुख यांनी दिला आहे. असे झाल्यास सांगोला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होणार हे निश्चित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सेलिब्रिटी आमदार म्हणून ओळखले जाणारे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. दीपकआबा साळुंखे पाटील हे अजितदादांचे घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार असून आता उद्धव ठाकरेंची मशाल हातात धरणार आहेत.
आज मातोश्री येथे दुपारी तीन वाजता दीपकआबा साळुंखे पाटील यांचा मोठे शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेत पक्षप्रवेश होत असून यासाठी सांगोल्यातून 500 पेक्षा जास्त गाड्या घेऊन दीपकआबांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधात दीपकआबा साळुंखे अशी लढत दिसण्याची शक्यता असून शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई रंगतदार असणार आहे.










