टीम लोकमन मंगळवेढा |
कार आणि मळणी यंत्र वाहनाच्या भीषण अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार झाले आहेत. विजापूर जिल्ह्यातील तालिकोट तालुक्यातील बिळेभावी क्रॉसजवळ हा अपघात झाला आहे. कार दुसर्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे.
निंगाप्पा पाटील (वय 55), शांतव्वा शंकर पाटील (वय 45 रा. अलियाबाद, ता. विजापूर), भीमशी संकनाळ (65), शशिकला जैनापूर (50), दिलीप पाटील (45) अशी मृतांची नावे आहेत. यादगिरी जिल्ह्यातील अग्नी गावात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.
क्रुझर गाडीला ओव्हरटेक करत असताना तालिकोटहून हुनसगीकडे जाणार्या मळणी यंत्र वाहनाची आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील पाचजण ठार झाले आहेत. तालिकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कारचा चेंदामेंदा झाल्याने मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बसनबागेवाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.









