टीम लोकमन मंगळवेढा |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26 वा वर्धापन दिन आज देशभर सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र वर्धापनदिनीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दोन मोठे हादरे बसले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाल धक्का बसला असून सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि साताऱ्यातील सत्यजित पाटणकर यांनी भाजपाची वाट धरल्याने शरद पवार गटाचे टेन्शन वाढले आहे.
सांगली जिल्ह्यातील विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवानेते वैभव पाटील भारतीय जनता पार्टीत दाखल होणार आहेत. मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वैभव पाटील आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असून हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा सुहास बाबर यांच्याकडून पराभव झाला होता.
सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरु होती. भाजपमध्ये जाण्याच्या अनुषंगाने सोमवारी पाटणकरांची कार्यकर्त्यासमवेत बैठक पार पडली. सत्यजीत पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशाने आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दिसू शकतो.
सत्यजित पाटणकर सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. आज मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात ते भाजपात प्रवेश करणार आहेत. रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. सातारा जिल्ह्यात भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सत्यजितसिंह पाटणकर यांच्या रूपाने देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.







