टीम लोकमन मंगळवेढा |
आपल्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे. पडळकर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचिकेतून निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हि याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार विक्रम सावंत यांनी दाखल केली आहे. जत विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत पडळकर यांनी विक्रम सावंत यांचा 37 हजार 881 मतांनी पराभव केला होता. राज्यातील इतर काही निकालाप्रमाणेच जतमधील निकाल देखील धक्कादायक ठरला होता. विस्तारित म्हैसाळ योजना, लाडकी बहीण योजना आणि उमदी एमआयडीसी अशा मुद्द्यांवर गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. ते 2019 मध्ये या मतदार संघाचे आमदार राहिले असून गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जत विधानसभा मतदार संघात तयारी केली होती. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी तेथे वातावरण निर्मिती करत आपला मतदारसंघ नसतानाही विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला होता.
पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून तीन एक महिने होत असून आता विक्रम सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विक्रम सावंत यांनी न्यायालयात धाव घेत गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. सावंत यांनी मतदार संघात बोगस मतदान झाले असून याचा फायदा पडळकर यांना झाल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत EVM वर देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे. न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांनी ही याचिका दाखल करून घेतली असून आता या प्रकरणावर 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.










