मंगळवेढा : अभिजीत बने
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना माकपचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा दिल्याने प्रणिती शिंदे यांचे बळ वाढले असून सोलापुरातील कष्टकऱ्यांची मते आता प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात पडू शकतात.
माकपचे नेते, माजी आमदार व सोलापूर शहरातील वजनदार व्यक्तिमत्व असलेले नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रणिती शिंदे यांच्या पाठिंबाची माहिती दिली. आडम मास्तर प्रणिती शिंदे सोबत आल्याने सोलापूर शहरामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य वाढणार आहे. शहरातील कष्टकरी, यंत्रमाग कामगार, विडी कामगार यांची बहुसंख्येने मते काँग्रेसला मिळू शकतात. आडम मास्तरांच्या निर्णयामुळे प्रणिती शिंदे यांचा मार्ग सुकर झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दत्तनगर येथील आडम मास्तर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी आडम मास्तरांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मास्तर म्हणाले, गेल्या दहा वर्षात विकासाला योग्य गती मिळाली नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणूनच देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी जनतेच्या सर्व समस्या व राज्याच्या परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना माकपच्या वतीने पाठिंबा जाहीर करत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला आहे.
आडम मास्तर म्हणाले, शहर मध्यची जागा माकपला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे या चर्चेनुसार शरद पवार यांनी सिताराम येचुरी यांच्याशी बोलून नंतर येचुरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे ठरले आहे यासंदर्भात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर त्यास माझी हरकत नसेल असा शब्द शिंदे आणि दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले.
एकूणच आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रचारात रंगत येणार असून यामुळे प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.







