टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यात किंगमेकर म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणातील मातब्बर नेते बबनराव आवताडे यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने मंगळवेढा तालुक्यात प्रणिती शिंदे यांचे बळ वाढले आहे. प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यात पाठिंबा वाढत असल्याने त्यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील वजनदार आणि मातब्बर नेते, ज्यांना तालुक्यामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर एक हाती वर्चस्व असलेले बप्पा अर्थात बबनराव आवताडे यांनी आपले वजन प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने मंगळवेढा तालुक्यात प्रणिती शिंदे यांचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून बबनराव आवताडे हे महाविकास आघाडीसोबत जाणार का महायुतीसोबत जाणार याबाबत तालुक्यामध्ये चर्चा होत होत्या. बरेच दिवस त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बबनराव आवताडे ज्या उमेदवाराला पाठिंबा देणार त्यांचे तालुक्यात मताधिक्य वाढणार हे निश्चित असल्याने ते कुणाला पाठिंबा जाहीर करणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रणिती शिंदे मोठा दिलासा मिळाला आहे तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.
बबनराव आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असून त्यांचा हा सहकाराचा गड अभेद्य आहे. तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही. संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मंगळवेढा तालुका कृषी उद्योग संघ, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती यांसह तालुक्यातील काही अपवाद वगळता जवळपास सर्वच विकास सोसायट्यांवर बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. त्यांची एकहाती सत्ता आहे. मंगळवेढा तालुक्याच्या सहकारातील जाणता राजा असेही त्यांना संबोधले जाते. मंगळवेढा तालुक्यामध्ये त्यांचा मोठा गट असून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांचे पुत्र सिद्धेश्वर आवताडे हे मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन असून ते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. तालुक्यांमध्ये युवकांची मोठी फळी त्यांच्यासोबत असून तालुक्यामधील युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. तालुक्यातील युवकांकडून त्यांना सरकार असे संबोधले जाते. सिद्धेश्वर आवताडे यांच्या दरबारात अनेक वाद मिटवले जातात. तालुक्यातील अनेक युवक त्यांचे प्रश्न घेऊन सिद्धेश्वर आवताडे यांच्याकडे येत असतात ते त्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निरसन करतात. त्यामुळे तालुक्यातील युवकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे सिद्धेश्वर आवताडे यांना मानणारा तालुक्यात युवकांचा मोठा वर्ग आहे. खरेदी विक्री संघावर युवकांचा मोठा वावर नेहमीच पाहायला मिळतो.
सिद्धेश्वर आवताडे संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उद्योग संघ या माध्यमातून जरी राजकारणात असले तरी ते पूर्णवेळ समाजकारण करतात. तालुक्यातील युवकांसाठी ते २४ तास उपलब्ध असतात. तालुक्यातील युवकांचे आधारवड म्हणून ते ओळखले जातात. पूर्वी बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे यांच्यासमोर जाण्यासाठी लोक घाबरायचे पण आता असंख्य लोक बिनधास्तपणे त्यांच्याकडे समस्या घेऊन जातात आणि त्या सुसंवादातून सुटतात. सिद्धेश्वर आवताडे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवर आंदोलने करून ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांसाठी अखंडितपणे कार्य करणारा आणि सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.
कोणत्याही निवडणुकीत बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे ज्यांना पाठिंबा देतात त्यांना मोठे मताधिक्य मिळते आणि तो उमेदवार विजयी होतो हा इतिहास आहे. त्यामुळे बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे यांच्या राजकीय भूमिकेकडे नेहमीच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत बबनराव अवताडे यांची भूमिका काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच होती त्यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी विलंब केल्याने राजकीय जाणकारांची उत्सुकता ताणली जात होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी बबनराव आवताडे यांची खरेदी विक्री संघावरील त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली होती. त्याचवेळी यांच्या गटाचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना मिळेल हे निश्चित झाले होते. परंतु काल त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याने प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यात मोठे राजकीय बळ मिळाले आहे. बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याने त्यांचे कार्यकर्ते बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे, शैलेश आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिती शिंदेंसाठी आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून प्रणिती शिंदेंना मोठे मताधिक्य मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.











