टीम लोकमन मंगळवेढा |
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा या प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सन 2017 -2022 पर्यंतच्या दहावीच्या बॅचेसचे विद्यार्थी उपस्थित होते. शनिवारी 8 जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधी म्हणून सोहम पाटील व कु.तनिष्का स्वामी यांची निवड करण्यात आली. या प्रतिनिधींचा यथोचित सत्कार- सन्मान प्राचार्य सुधीर पवार सर व ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण नागणे सर यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळी 11.00 वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शाळेविषयी असलेला जिव्हाळा आणि शिक्षकांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांमध्ये अजय गवळी, कल्पेश कांबळे, लक्ष्मण नागणे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य सुधीर पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत गप्पा मारत त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा चे सर्वेसर्वा डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे यांनी माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत भावी आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनिता केदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी सातपुते व प्रतिभा यल्लटिकर यांनी केले व आभार सौ. प्रभाताई राजगुरू यांनी मानले. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.