टीम लोकमन मंगळवेढा |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी ता. मंगळवेढा येथील उपशिक्षक अशोक शंकर मलगोंडे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पदोन्नतीने मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवाडी येथे त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदभार देण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील रहिवाशी असलेले अशोक शंकर मलगोंडे यांनी 25 एप्रिल 1990 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती तालुका पंढरपूर येथून आपल्या शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माळशिरस तालुक्यातील दसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन वर्ष शैक्षणिक सेवा केल्यानंतर त्यांची मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बदली झाली.
भाळवणी येथे दोन वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर त्यांची भालेवाडी तालुका मंगळवेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नियुक्ती करण्यात आली. 1995 ते 2008 अशी दीर्घकाळ भालेवाडी शाळेत शैक्षणिक सेवेनंतर सन 2008 ते 2023 असे प्रदीर्घ काळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरवडे येथे ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर सन 2023 पासून ते आजपर्यंत अशोक मलगोंडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी येथे उपशिक्षक म्हणून आपले कर्तव्य अतिशय निष्ठेने करीत आहेत. अतिशय शांत, संयमी मनमिळावू व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.
अशोक मलगोंडे हे शैक्षणिक सेवेसोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदवत असतात. नर्मदा पार्क येथील गणेश मंदिर व गणेश बालोद्यान उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा होतकरू स्वभाव व दानशूर वृत्तीमुळे अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी उभारण्यात आलेल्या अनेक आंदोलनांमध्ये आणि मोर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.
डोणज येथील अतिशय गरीब व शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक मलगोंडे यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने, कौशल्याच्या व बौद्धिक चातुर्याच्या जोरावर मंगळवेढा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे व नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यांच्या पत्नी देखील प्राथमिक शिक्षिका असून त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरवडे येथे कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी अनुजा ही धाराशिव जिल्ह्यात तालुका पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर मुलगा अक्षय हा राष्ट्रीयकृत बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
अशोक मलगोंडे यांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवाडी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने बंडगरवाडी जिल्हा परिषद शाळेला एक उत्तम प्रशासक व शिस्तबद्ध शिक्षक मुख्याध्यापक म्हणून लाभला आहे.
अशोक मलगोंडे यांच्या पदोन्नतीबद्दल आमदार समाधान आवताडे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, संचालक प्रा. रेवनसिद्ध लिगाडे, अशोक केदार, माजी चेअरमन शशिकांत बुगडे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संजय चेळेकर, प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत.
माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, संत चोखामेळानगर ग्रामपंचायतचे सदस्य प्रा. शंभूदेव कदम, शिक्षक नेते मल्लिकार्जुन माळी, राजेंद्र कोरे, राजकुमार कोष्टी, नानासाहेब जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, उद्योजक बसवराज येडसे, दशरथ गणपाटील, श्री संत दामाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन घुले, उद्योजक दिलीप घाडगे, रावसाहेब चव्हाण, संतोष बुरकूल, प्रा. नवनाथ सावळे, प्राचार्य आप्पासाहेब काटकर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी डेप्युटी जनरल मॅनेजर पवार नाना, भीमराव डांगे, केंद्रप्रमुख रावसाहेब सूर्यवंशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









