टीम लोकमन मंगळवेढा |
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्या रविवारी निघणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश पवार व सरचिटणीस शरद रुपनवर यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दि. २८ रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनांस शिक्षक समितीने जाहीर पाठिंबा दर्शविला असून सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विभागातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊन आक्रोश मोर्चातही सहभागी होणार आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व सध्याच्या योजनेविषयी आपला रोष व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन मार्गदर्शक अनिल कादे , राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य प्रसिद्धी प्रमुख डॉ. रंगनाथ काकडे, राज्य संघटक प्रताप काळे, सदस्य अनिल बंडगर, पुणे विभागाचे उपाध्यक्ष मो.बा. शेख, जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर, कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे, कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव, महिला आघाडी प्रमुख ज्योती कलुबर्मे, दिपाली बोराळे यांनी केले आहे.
उद्या रविवार दि. २८ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दु. १२ वाजता पार्क चौकातून मोर्चा निघणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदे समोरील पूनम गेट समोर या मोर्चाची सांगता होणार असून याच परिसरात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील ‘अभी नही तो कभी नही’ या इराद्याने हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे.







